पुण्यातील शिवसेनेच्या “या” नेत्याला जीवे मारण्याची धमकी

0
29

आटपाडी टाइम्स न्युज : पुणे : शिवसेना ठाकरे गटाचे पुण्याचे नेते वसंत मोरे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मनसेच्या कार्यकर्त्याने आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप वसंत मोरे यांच्याकडून करण्यात आला आहे. मनसेच्या एका कार्यकर्त्याने वसंत मोरे यांच्या भाच्याला फोनवरुन वसंत मोरे यांना मारण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. वसंत मोरे यांचा भाचा प्रतिक कोडितकर आणि कथित मनसे कार्यकर्त्याच्या फोनवरील संभाषणाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. संबंधित प्रकार समोर आल्यानंतर पुण्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

वसंत मोरे यांचा भाचा प्रतिक कोडितकर याला एका अज्ञात मनसे कार्यकर्त्याने फोन केला. या फोनमध्ये कथित मनसे कार्यकर्त्याने आपण या महिन्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये वसंत मोरे यांची विकेट पाडणार, अशी धमकी दिली आहे. “तू माझी पोलीस ठाण्यात तक्रार कर. माझ्यावर आधीच 13 ते 14 तक्रारी आहेत. आणखी एक होईल. मला काही फरक पडत नाही. वेळ पडली तर मी एखाद वर्ष आतमध्ये जाईन. पण मी वसंत मोरेची विकेट पाडणार म्हणजे पाडणार. मी मनसेचा कार्यकर्ता आहे. मनसेचं काम करतो”, असं धमकी देणारा व्यक्ती म्हणतो.

वसंत मोरे यांनी वंचितच्या तिकीटावर निवडणूक लढल्यानंतर आता त्यांनी आपली राजकीय वाटचाल दुसऱ्या पक्षाकडे वळवली आहे. वंचितच्या तिकीटावर आपल्याला लोकांनी स्वीकारलेलं नाही. त्यामुळे आपण वंचितची साथ सोडत असल्याचं वसंत मोरे यांनी म्हटलं होतं. पण वसंत मोरे यांच्या या भूमिकेमुळे त्यांना वंचितच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. वंचितच्या पुण्यातील पदाधिकाऱ्यांनी वसंत मोरे यांचं कार्यालय फोडण्याचा इशारा दिला होता. यानंतर पुणे पोलिसांची फौज वसंत मोरे यांच्या कार्यालयाबाहेर दाखल झाली होती.

 

वसंत मोरे यांनी ठाकरे गटात जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे वंचितचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आक्रमक झाले होते. अखेर हा सगळा विरोध झुगारत वसंत मोरे यांनी ठाकरे गटात काही दिवसांपूर्वी प्रवेश केलाय. पुण्यात आता ठाकरे गटाचा कार्यक्रम देखील होणार आहे. असं असताना आता वसंत मोरे यांना जीवे मारण्याची धमकी आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी आता पोलीस काय कारवाई करतात? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here