आटपाडी : अपघातात दोन चिमुकल्यांसह आई जागेवरच ठार

0
3

आटपाडी टाइम्स न्युज/ आटपाडी : तासगाव-सांगली रस्त्यावर कवलापूर येथे भरधाव प्रवासी जीपने दुचाकीला धडक दिल्यामुळे तिघेजण ठार झाले. दिपाली विश्वास म्हारगुडे (वय २८), मुलगा सार्थक (वय ७), राजकुमार (वय ५,रा.आंबा चौक, यशवंतनगर, सांगली) मूळ रा. तळेवाडी ता. आटपाडी, जि. सांगली अशी मृतांची नावे आहेत. तर दुचाकीस्वार विश्वास दादासाहेब म्हारगुडे (वय ३०) हे गंभीर जखमी झाले आहेत.सकाळी सव्वा दहाच्या सुमारास अपघात झाला. अपघातानंतर जीप चालक नितेश नाटेकर (रा. तासगाव) हा पसार झाला.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, विश्वास म्हारगुडे हा मुळचा तळेवाडी (ता.आटपाडी) येथील असून तो सांगलीत वास्तव्यास आहे. बुधवारी तळेवाडी येथे लग्नासाठी तो पत्नी दिपाली, मुले सार्थक, राजकुमार यांच्यासमवेत दुचाकी (एमएच १० एएच ८७३२) वरून निघाला होता. कवलापूर ते कुमठे फाटा दरम्यान समोरून आलेल्या काळी पिवळी प्रवासी जीपने विश्वास याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

धडक इतकी जोरात होती की दुचाकी मोडून पडली. दुचाकीवर समोरच्या बाजूला वडिलासमोर बसलेल्या राजकुमार याच्या गळ्याला पत्रा कापून तो जागीच ठार झाला. दुसरा मुलगा राजकुमार आणि दिपाली यांच्या डोक्यात गंभीर मार लागून ते जागीच मृत झाले. तर दुचाकीस्वार विश्वास यालाही गंभीर दुखापत झाली. या अपघातानंतर, वडाप गाडी चालकाने तेथून पळ काढला. यावेळी पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली. दोन भावंडासह आईचा अपघाती मृत्यू झाल्याचे पाहून हळहळ व्यक्त होत होती.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here