आटपाडी टाइम्स न्युज : सांगली : सांगली जिल्ह्यात दि. 20, 22, 23 व 24 जुलै 2024 या कालावधीत जिल्हा परिषद सांगली कडील गट-क संवर्गातील 754 पदांसाठी सरळसेवा भरती परीक्षा सन-2023 एकूण 6 केंद्रावर घेण्यात येणार आहे. परीक्षा केंद्राच्या ठिकाणी शांतता व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी परीक्षा केंद्राच्या ठिकाणी इमारतीपासून 100 मीटर सभोवतालच्या परिसरात परीक्षा कालावधीत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू केले असल्याचे आदेश निर्गमित केले आहेत.
आदेशात म्हटले आहे, परीक्षा वेळेत परीक्षेसंबंधी अधिकारी / कर्मचारी व परीक्षेस येणारे विद्यार्थी तसेच त्यांचे लेखनिक वगळता इतर कोणत्याही चार किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींना परीक्षा केंद्राच्या ठिकाणी फिरण्यास, एकत्रित गटागटाने फिरणे व उभा राहण्यास मनाई केली आहे. तसेच परिक्षा वेळेत परिक्षा केंद्राच्या परिसरातील झेरॉक्स मशिन, पब्लिक टेलिफोन बुथ, फॅक्स मशिन, ध्वनीक्षेपक यांचा परिक्षा संदर्भात कोणत्याही गैरप्रकारासाठी वापरण्यास मनाई केली असून परिक्षा केंद्रात विद्यार्थी तसेच त्यांचे लेखनिक यांना मोबाईल, पेजर, ब्लूटूथ, वायफाय डिव्हाईस, डिजिटल कॅमेरा, स्मार्ट वॉच, इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस व डिजिटल डिव्हाईस इत्यादी नेण्यास मनाई केली आहे.
ही परिक्षा आदर्श इंस्टीट्युट ऑफ टेक्नोलॉजी ॲन्ड रिसर्च सेंटर विटा या केंद्रावर 20 जुलै 2024 रोजी, नानासाहेब महाडिक कॉलेज ऑफ इंजिनियरिंग पेठ या केंद्रावर 20, 22 व 23 जुलै 2024 रोजी, नानासाहेब महाडिक पॉलीटेक्निक इन्स्टिट्यूट पेठ या केंद्रावर 20, 22, 23 व 24 जुलै 2024 रोजी, पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील महाविद्यालय तासगाव या केंद्रावर 20, 22 व 24 जुलै 2024 रोजी, टेकवेअर टेक्नोलॉजी विठ्ठल पाटील पॉलीटेक्निक इनामधमनी, सांगली या केंद्रावर 20, 22 व 24 जुलै 2024 रोजी, वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज ॲन्ड रिसर्च, भारती विद्यापीठ जवळ, सांगली-मिरज रोड,सांगली या केंद्रावर 20, 22, 23 व 24 जुलै रोजी सकाळी 6 ते सायंकाळी 7.30 या वेळेत घेण्यात येणार आहे.
हा आदेश कायदेशिर कर्तव्य बजावित असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना व धार्मिक विधी यांना लागू राहणार नाही, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी जारी केले आहेत.