आटपाडी टाइम्स न्युज :सागंली : 65 वर्षे वय व त्यावरील जेष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपायोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने, उपकरणे खरेदी करण्याकरीता तसेच मन:स्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र इत्यादीव्दारे त्यांचे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी महाराष्ट्र राज्यात “मुख्यमंत्री वयोश्री योजना” राबविण्यास शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे.
या योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्यास दि. 7 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदत असून जिल्ह्यातील जास्तीत जास्त जेष्ठ नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण सांगली कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त जयंत चाचरकर यांनी केले आहे.
या योजनेच्या पात्र लाभार्थ्यास त्याच्या आधारसंलग्न खात्यावर 3 हजार रूपये एकदाच वर्ग करण्यात येणार आहेत. त्यास अनुसरून सांगली जिल्ह्याअंतर्गत ग्रामीण तसेच तालुका क्षेत्रातील पात्र लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत असून अर्जासोबत आधार कार्ड झेरॉक्स, उपकरण हवे असल्याबाबतचे वैद्यकिय प्रमाणपत्र, जन्म तारखेचा पुरावा, दोन फोटो, राष्ट्रीयकृत बँक पासबुक झेरॉक्स,उत्पन्नाबाबत स्वयंघोषणापत्र जोडणे आवश्यक आहे.
या योजनेसाठी दाखल करावयाचा अर्ज विनामुल्य आहे. हा अर्ज ग्रामीणस्तरावर ग्रामपंचायत येथे ग्रामसेवक तसेच नजिकच्या अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, यांच्याकडे उपलब्ध असून नगरपालिका/नगरपंचायतस्तरावर मुख्याधिकारी तथा त्यांनी नेमून दिलेले नोडल अधिकारी यांच्याकडे अर्ज उपलब्ध आहेत. अर्जात नमुद केलेल्या आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करुन परिपूर्ण अर्ज त्यांचेकडेच जमा करावा, असे आवाहनही श्री. चाचरकर यांनी केले आहे.