असंघटीत कामगारांसाठी प्रत्येक तालुक्याचे ठिकाणी शासकीय कार्यालये सुरू करा : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या “या” नेत्याची मागणी

0
26

आटपाडी टाइम्स न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ या शासनाच्या असंघटीत कामगारांच्या मंडळाची शासकीय कार्यालये प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी सुरू करून या कामगारांची होणारी ससेहोलपट थांबवावी. असे आवाहन सादिक खाटीक यांनी केले. शासनमान्य असंघटीत कामगारांच्या मंडळाकडून नोंदणीकृत असंघटीत कामगारांना मिळालेल्या भांड्याच्या कीटचे वाटप सादिक खाटीक, राजेंद्र खरात, दीपक देशमुख वगैरे अनेक मान्यवरांच्या हस्ते वाटप करणेत आले. परवा झरे येथे २५० आणि बनपूरी येथे आज २०० भांड्यांच्या कीटचे वाटप करणेत आले. त्याप्रसंगी सादिक खाटीक बोलत होते.

प्रारंभी स्वागत प्रास्ताविक करताना कार्यक्रमाचे संयोजक दादासाहेब वाघमारे यांनी गत काळातल्या कार्याचा लेखा जोखा मांडत शेकडो असंघटीत कामगारांची नोंदणी करण्यात त्यांना शासनाच्या सोयी सुविधा मिळवून देण्यात नेहमीच उर्जा वाढविणारा उत्साह आनंद आपणास मिळत असल्याचे सांगीतले.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या ओबीसी विभागाचे प्रदेशचे उपाध्यक्ष, आणि कुरेश कॉन्फरन्स नवी दिल्लीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सादिक खाटीक पुढे म्हणाले, गत काही वर्षापासून बनपूरी आणि झरेत या असंघटीत कामगारांच्या मोठ्या नोंदणीचे काम करणाऱ्या दादासाहेब वाघमारे, धनंजय वाघमारे या जोडगोळीने निस्पृहपणे मोठे सामाजीक काम केले आहे. असंघटीत कामगार चळवळीतल्या नेतृत्वाचा वसा वारसा घेऊन काम करणाऱ्या वाघमारे बंधूनी शेकडो कुटुंबाच्या मागे शासनाला उभे करण्याचे काम केले आहे. त्यांनी ही चळवळ तालुक्याच्या प्रत्येक गावापर्यत न्यावी.

आटपाडी तालुक्याचे शिल्पकार बाबासाहेब देशमुख, अमरसिंहबापू देशमुख, रुक्मीणीताई यमगर, सौ.जयमाला देशमुख, हर्षवर्धन देशमुख असे तालुका पंचायत समितीचे ५ सभापती, माजी आमदार राजेंद्रआण्णा देशमुख, माजी जि.प. अध्यक्ष अमरसिंहबापू देशमुख, लावणी सम्राज्ञीचा अवॉर्ड तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हस्ते स्विकारणाऱ्या मुळच्या बनपूरीकर पांचाळ सुतार समाजाच्या सत्यभामाबाई पंढरपूरकर या मान्यवर महोदयासह अनेक उच्चपदस्थ अधिकारीही बनपूरीने घडविले आहेत, राज्याला दिले आहेत. अशा समृद्ध वारशाच्या बनपूरीतील दादासाहेब वाघमारे यांनी या असंघटीत कामगार चळवळीचे तालुक्याचे नेतृत्व करावे. असे सादिक खाटीक यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले.

देशाचे खरे मालक असणाऱ्या शेतकरी, कष्टकरी, संघटीत-असंघटीत कामगार, उपेक्षित, वंचित,मागास, नागरीक महिला यांच्या हिताचे निर्णय घेत देश समृद्ध केला पाहिजे. शासन व्यवस्थेतील शिक्षण प्रणाली, आरोग्य व्यवस्था प्रचंड विकसीत केली पाहीजे. आणि ती सर्वांना मोफत पुरविली पाहीजे. ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याच्या बांधापर्यंत बंदिस्त पाईपलाईनने पाणी, २४ तास वीज, खते, बी, बियाणे, औषधे मोफत देवून शेतीव्यवस्था मजबुत केल्यास भारत देश जगात अव्वल आल्याशिवाय राहणार नाही. असा आशावाद सादिक खाटीक यांनी शेवटी व्यक्त केला.

आरपीआय आठवले गटाचे सांगली जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात यांनी, सर्वांना शुभेच्छा देताना दादासाहेब वाघमारे यांना सामाजीक दृष्ट्या उभे करण्याचे काम आपण केल्याचे स्पष्ट करून या असंघटीत कामगारांसाठीच्या अनेक सुविधांचा नोंदणीकृत सभासदांनी अभ्यासू वृत्तीने घ्यावा असे आवाहन केले.

असंघटीत कामगारांच्या या योजनेची सविस्तर माहिती देवून, नोंदणी करताना येणाऱ्या अडचणी, समस्या व त्यावरील उपाय सांगताना, झरेचे माजी सरपंच तथा ही योजना झरे येथे मोठ्या प्रमाणावर राबविणारे धनंजय वाघमारे यांनी प्रकरणे मंजुर करताना अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या अडवणूकीवर शासनाने उपाय योजना करावी . असे आवाहन केले.

यावेळी मच्छिंद्र पाटील सर, भिमराव साळुंखे सर यांची भाषणे झाली.कार्यक्रमास लोकनियुक्त सरपंच दीपक देशमुख, उपसरपंच सुरेश काळे, माजी सरपंच राजेंद्र यमगर, माजी सरपंच संजय यमगर, बाळेवाडी पोलीस पाटील सोमनाथ कोळेकर, जेष्ट नेते नामदेव यमगर, युवा नेते सुनील वाघमारे, वंचित आघाडी तालुका उपाध्यक्ष अनिल वाघमारे, सोसायटी चेअरमन अगतराव माने माजी चेअरमन विठ्ठल पूकळे , विकास मंडले अजय मंडले, मारुती मस्के ,माजी ग्रामपंचायत सदस्य धनंजय कांबळे बनपुरी सोसायटी संचालक जहांगीर आतार , गोरख मंडले, शशिकांत गुरव, बनपुरी वंचित शाखा अध्यक्ष विक्रम मोरे, शाखा कोषाध्यक्ष उदय कांबळे बाजीराव घुटुकडे , अंकुश काळे, तळेवाडीचे बाळू नाना सरगर, विजय सरगर, सागर मरगळे, दादा वायदंडे, अक्षय तोरणे, इत्यादी अनेक मान्यवरांसह बनपूरी, तळेवाडी, बाळेवाडी, खरसुंडी आणि तडवळे येथील नोंदणीकृत असंघटीत कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here