आटपाडी टाइम्स न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील खरसुंडी येथील प्रसिद्ध सिद्धनाथ देवस्थानला अखेर ब वर्गाचा दर्जा शासन निर्णय होऊन मिळाला. पुरातन हेमाडपंथी असलेले हे मंदिर महाराष्ट्रातील व इतर राज्यातील लाखो भाविक भक्तांचे श्रद्धास्थान व कुलदैवत आहे. अनेक वर्षा पासून हे देवस्थान सर्वांगीण विकासापासून वंचित राहिले असून ‘क’ वर्ग दर्जातच होते.
पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या पुढाकाराने आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विशेष प्रयत्नातून मा.खा. संजयकाका पाटील व मा. आ. राजेंद्रअण्णा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली परिपूर्ण प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला होता. त्यांच्या प्रयत्नाला यश मिळत शासन निर्णय होऊन प्रसिद्ध सिद्धनाथ देवस्थानला ‘ब’ वर्गाचा दर्जा मंजूर झाला. पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आदेशाचे पत्र लोकनियुक्त सरपंच धोंडीराम इंगवले, ग्रामपंचायत सदस्य विक्रम भिसे, राहुल गुरव यांच्याकडे सुपूर्द करीत कुलदैवत असलेल्या सिद्धनाथाच्या भाविक भक्तांना व ग्रामस्थांना दिलेल्या शब्दाची वचनपूर्ती केल्याची भावना व्यक्त केली. यामुळे ग्रामस्थ व भाविकातून समाधान व्यक्त करीत फटाक्याचे आतिषबाजी करून शासनाचे आभार मानले.
यावेळी लोकनियुक्त सरपंच धोंडीराम इंगवले म्हणाले, खरसुंडी देवस्थान ‘ब’ वर्ग दर्जा मिळण्यासाठी पालकमंत्री आजी-माजी आमदार खासदार यांची शिफारस पत्र सह परिपूर्ण प्रस्ताव शासनाकडे दाखल करण्यात आला. याकरिता खरसुंडी देवस्थान समितीचे चंद्रकांत पुजारी, माजी उपसरपंच दिलीप सवणे, नंदकुमार निचळ, उपसरपंच राजाक्का कटरे, ग्रामपंचायत सर्व सदस्य, प्रशासकीय अधिकारी यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य मिळाले. यापुढेही खरसुंडी देवस्थानचा सर्वांगी विकास साधण्यासाठी विकास आराखडा तयार करून भरीव निधीची तरतूद शासनाने करावी अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.